नवी दिल्ली - देशातील प्रमुख आठ अशा मुलभूत क्षेत्रात सलग नवव्यांदा नोव्हेंबरमध्ये घसरण झाली आहे. नोव्हेंबरमध्ये प्रमुख आठ क्षेत्रांच्या उत्पादनात २.६ टक्क्यांची घसरण झाली आहे.
नैसर्गिक वायू, तेलशुद्धीकरण उत्पादने, स्टील आणि सिमेंट यांच्या उत्पादनात घसरण झाली आहे. त्यामुळे प्रमुख आठ क्षेत्रांच्या उत्पादनात घसरण झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार प्रमुख आठ क्षेत्रांचा नोव्हेंबर २०१९ मध्ये ०.७ टक्के वृद्धीदर राहिला. मात्र नोव्हेंबर २०२० मध्ये कोळसा, खते आणि वीजनिर्मिती वगळता सर्वच प्रमुख क्षेत्रांच्या उत्पादनात घसरण झाली आहे.
हेही वाचा-फ्लिपकार्टसह अॅमेझॉनवर कारवाईचे ई़डीला केंद्राकडून आदेश
चालू वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत प्रमुख आठ क्षेत्रांच्या उत्पादनात ११.४ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर मागील वर्षात एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये प्रमुख आठ क्षेत्रांचा ०.३ टक्के वृद्धदीर होता.
नोव्हेंबरमध्ये अशी झाली घसरण-
- कच्चे तेल (-४.९), नैसर्गिक वायू (-९.३), तेलशुद्धीकरण उत्पादने (४.८) , स्टील (-४.४) आणि सिमेंटच्या उत्पादनात ४.९ टक्क्यांची घसरण झाली आहे.
- दुसरीकडे कोळसाच्या उत्पादनात २.९ टक्क्यांची तर वीजनिर्मितीच्या उत्पादनात २.२ टक्क्यांची वृद्धी झाली आहे.
- खतनिर्मिती क्षेत्रातील वृद्धीदर हा १.६ टक्के राहिला आहे. तर मागील वर्षात नोव्हेंबरमध्ये खतनिर्मितीचा १३.६ टक्के वृद्धीदर राहिला आहे.
देशाच्या औद्योगक उत्पादन निर्देशांकात प्रमुख आठ क्षेत्रांचे ४०.२७ टक्के हिस्सा राहिला आहे. त्यामुळे प्रमुख आठ क्षेत्रांतील उत्पादनात घसरण झाल्याने औद्योगिक उत्पादनात घसरण सुरुच असल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा-इंग्लंडकडून अॅस्ट्राझेनेका लसीला मंजुरी ही सकारात्मक बातमी-सीरम