नवी दिल्ली - देशाची अर्थव्यवस्था संकटात नाही. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे दिसत आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. देश ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने जात असल्याचेही सीतारामन यांनी म्हटले.
केंद्र सरकारने थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढविले आहे. कारखान्यातील उत्पादनात वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यात वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन १ लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. ही मंदावलेल्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याची चिन्हे आहेत.
अर्थव्यवस्था सुधारल्याचे सात महत्त्वाच्या निर्देशकामधून दिसत आहे. ते राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करताना बोलत होत्या. शेअर बाजार निर्देशांक वधारत आहे. तर विदेशी चलनाची गंगाजळीचा आजपर्यंतचा सर्वोच्च विक्रम आहे. खासगी गुंतवणूक, निर्यात, खासगी आणि सार्वजनिक उपभोक्ततामध्ये वाढ या चार विकासाच्या इंजिनवर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे.
हेही वाचा-चिकन खाणे सुरक्षित, कोरोनाचा संसर्ग होत नाही- केंद्र सरकार
सरकारी गुंतवणुकीबाबत राष्ट्रीय पायाभूत पाईपलाईन योजनेची डिसेंबरमध्ये सरकारने घोषणा केली होती. येत्या चार वर्षात १.०३ लाख कोटी रुपये पायाभूत विकासांवर खर्च करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने वर्ष २०१९-२० साठी रब्बी आणि खरिप पिकांची किमान आधारभूत किंमत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात वित्तीय तुटीचे प्रमाण अधिक होते. तेव्हा अर्थव्यवस्था ही पात्र डॉक्टरांकडून हाताळली जात होती, असा टोलाही त्यांनी विरोधी पक्षांना लगावला.
हेही वाचा-निर्मला सीतारामन आपली जबाबदारी दुसऱ्यावर टाकू शकत नाहीत- अमित मित्रा
नुकतेच माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी देशाची अर्थव्यवस्था कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे म्हटले होते. तर अपात्र डॉक्टरांकडून रुग्णाला पाहिले जाते असल्याचेही चिदंबरम यांनी म्हटले होते.