नवी दिल्ली - मोदी सरकारने पाच वर्षापूर्वी जनधन योजनेमध्ये अनेकांची खाती काढली आहेत. या योजनेतील जमा रकमेने १ लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार पंतप्रधान जन धन योजनेत (पीएमजेडीवाय) एकूण १ लाख ४९५.९४ कोटींची रक्कम जमा आहे. ही रक्कम ३४.०६ कोटी जणांच्या खात्यामध्ये जमा आहे.
जनधन योजनेतील जमा रक्कमेत वरचेवर वाढ होत आहे. आठवडाभरापूर्वी ही रक्कम ९९ हजार २३२.७१ कोटी रुपये एवढी होती.
अशी आहे जनधन योजना -
जनधन योजनेची २८ ऑगस्ट २०१४ ला सुरुवात झाली. देशातील सर्व घटकांना बँकिंग सुविधा देणे म्हणजे अर्थसमावेशकतेसाठी योजनेची सुरुवात करण्यात आली. ही खाती प्राथमिक बचत खात्यांतर्गत (बीएसबीडी) काढण्यात आली आहे. त्याचबरोबर रुपे डेबिट कार्ड आणि ओव्हरड्राफ्टची सुविधादेखील देण्यात आली आहे. त्यासाठी खात्यावर शून्य पैसे असले तरी बँक खाते सुरू राहते. केंद्र सरकारने २ लाखाचा अपघात विमादेखील खातेदारांना दिला आहे. तर ओव्हरड्राफ्ट १० हजार रुपयापर्यंत काढण्याची सेवा दिली आहे.
या योजनेत ५० टक्क्यांहून अधिक महिला खातेदार आहेत. या योजनेचा वापर करून केंद्र सरकारने थेट लाभार्थी निधी हस्तांतर योजना (डीबीटी) राबविली आहे.