जळगाव - चीनमध्ये कोरोना विषाणुची लागण वाढल्याने चीन सरकारने ८० टक्के आयात-निर्यात थांबविली आहे. त्यामुळे भारताकडून येणाऱ्या कापसाचीही आयातही चीनने थांबवली आहे. देशात कापसाच्या ३ लाख गाठी देशात पडून आहेत. निर्यात थांबल्यामुळे भारतीय कापूस निगमने (सीसीआय) जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र बंद केले आहेत.
सरकारी कापूस खरेदी बंद झाल्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनाही नाईलाजास्तव हमीभावापेक्षा तब्बल ५०० रुपये कमी दराने कापूस विकावा लागत आहे.
चीन हा भारताचा आयात करणारा प्रमुख देश आहे. दरवर्षी भारताकडून १२ ते १५ लाख गाठी चीनला निर्यात होतात. यंदा जानेवारीपर्यंत ६ लाख गाठींची निर्यात चीनमध्ये झाली आहे. मात्र, कोरोना विषाणुचे प्रमाण वाढत असल्याने चीनमधून आयात-निर्यात थांबविली आहे. त्यामुळे कापसाची निर्यात पुर्णपणे थांबली आहे. भारतासह अमेरिका व इतर देशातील निर्यात थांबविल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील त्याचा परिणाम होत आहे. आधीच अमेरिका व चीनच्या व्यापार युद्धामुळे चीनमधील निर्यातीवर परिणाम झाला होता.
अचानक कापूस केंद्र बंद करण्याचा फतवा-
सीसीआयचे केंद्र दरवर्षी मार्च-एप्रिलपर्यंत सुरू राहत असतात. मात्र, ३० जानेवारीला सीसीआयने तातडीने पत्र काढून ५ फेब्रुवारीपर्यंत कापूस खरेदी थांबविण्याचे काढले. तसेच पुढील आदेश येईपर्यंत खरेदी सुरू करू नये असेही आदेश सीसीआय प्रशासनाने काढले आहेत. कापूस खरेदी थांबविण्याबाबतचे कोणतेही कारण सीसीआयने दिलेले नाही.
हेही वाचा-खरेदी केल्यानंतर जीएसटीचे बिल घ्या अन् जिंका १ कोटीपर्यंत लॉटरी!
हमीभावात १०० रुपयांची घट-
आंतरराष्ट्रीय बाजारात पसरलेल्या मंदीचा परिणाम कापसाच्या भावावरदेखील झाला आहे. लाखो गाठी देशांतर्गत बाजारपेठांमध्ये पडून असल्याने आठवडाभरात हमीभावात १०० रुपयांची घट झाली आहे. सरकारने कापसाचा हमीभाव ५,५५० एवढा निश्चित केला होता. मात्र, सध्या ५, ४५० या भावाने कापसाची खरेदी होत आहे. सीसीआयने जरी खरेदी थांबवली असली तरी पणन महासंघाचे खरेदी केंद्र सुरू आहे.
हेही वाचा-कोरोना विषाणुचा देशातील पर्यटनासह इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रावर परिणाम
सीसीआयचे केंद्र बंद होताच व्यापारी-एजंट सक्रिय-
जिनींग किंवा सरकारी खरेदी केंद्रावर १५ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. अद्याप ५० टक्के माल शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. त्यातच सरकारी खरेदी थांबल्यामुळे पुन्हा सुरू होईल की नाही ? याबाबत साशंकता आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना खासगी जिनींग व व्यापाऱ्यांना माल देण्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीत व्यापाऱ्याकडून ४७०० ते ४८०० रुपये प्रति क्विंटल कापूस खरेदी केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल तब्बल ५०० ते ६०० रुपयांचे नुकसान होत आहे.