बिझनेस डेस्क, ईटीव्ही भारत- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या घोषणांचे लोकसभेत समर्थन केले. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी १ फेब्रुवारी २०२१-२२ ला अर्थसंकल्प सादर केला होता.
अर्थसंकल्पात भांडवलदारांच्या बाजूने झुकते माप दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पावरील चर्चासत्रात उत्तर दिले.
हेही वाचा-किरकोळ बाजारपेठेत जानेवारीत महागाईचे प्रमाण कमी; ४.०६ टक्क्यांची नोंद
- अर्थसंकल्प हा देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सादर करण्यात आला. आत्मनिर्भर भारतासाठी अर्थसंकल्पात पावले उचलण्यात आल्याचे सीतारामन यांनी सांगितले. महामारीचे संकट हे दीर्घकाळाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सरकारला परावृत्त करू शकत नाहीत.
- राहुल गांधी हे विविध मुद्द्यावर चुकीचे कथन पसरवित असल्याचा आरोप निर्मला सीतारामन यांनी केला. कृषी कायद्यावर काँग्रेसने का यू-टर्न घेतला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसेने २०१९ च्या निवडणूक जाहीरनाम्यात कृषी क्षेत्रातील सुधारणांचे आश्वासन दिले होते, अशी त्यांनी आठवण करून दिली.
- पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत १.१५ लाख कोटी रुपये देशातील १०.७५ कोटी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत.
- पश्चिम बंगालच्या सरकारने ६५ लाख शेतकऱ्यांची यादी दिली नाही. त्यामुळे ते शेतकरी योजनेपासून वंचित राहिल्याची टीका त्यांनी बंगाल सरकारवर केली.
- कोरोनाच्या काळात एमएसएमई उद्योगांना सरकारने दिलासा देण्यात आला आहे.
- भाजप हे काँग्रेसप्रमाणे जावयांसाठी काम करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे सामान्य माणसांसाठी काम करत आहे. छोट्या व्यापाऱ्यांसाटी स्वनिधी योजनेसह विविध घटकांसाठी योजना असल्याची त्यांनी लोकसभेत माहिती दिली.
हेही वाचा- महागाईचा भडका! खाद्यतेलाच्या किमतीत जानेवारीत २० टक्क्यांची वाढ