नवी दिल्ली - केंद्रीय वित्त मंत्रालयाने अर्थसंकल्प २०२० ची तयारी सुरू केली आहे. उद्योग आणि व्यापारी संघटनांकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराराबाबत सूचना मागविल्या आहेत. पहिल्यांदाच वित्त मंत्रालयाने अशा प्रकारच्या सूचना मागविल्या आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन '२०२०-२१ अर्थसंकल्प' १ फेब्रुवारीला सादर करणार आहेत. वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाने परिपत्रक काढून नागरिक आणि कंपन्यांकडून अर्थसंकल्पाविषयी सूचना मागविल्या आहेत. अप्रत्यक्ष करामध्ये समावेश असलेल्या उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्काबाबत नागरिक व कंपन्यांना सूचना करता येणार आहेत.
हेही वाचा-किरकोळ बाजारपेठेत ऑक्टोबरदरम्यान महागाईचा भडका; ४.६२ टक्क्यांची नोंद
वित्त मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार सूचना या आर्थिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहेत. सूचनांबरोबर उत्पादन, किंमत आणि महसूलात बदल होणारी सांख्यिकी आकडेवारीही देणे आवश्यक आहे. या सूचना कंपन्या अथवा नागरिकांना २१ नोव्हेंबरपर्यंत द्याव्या लागणार आहेत. वस्तू व सेवा करासाठी (जीएसटी) स्वतंत्र जीएसटी परिषद आहे. त्यामुळे जीएसटीबाबतच्या सूचनांचा विचार करण्यात येणार नसल्याचे वित्त मंत्रालयाने परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
हेही वाचा-शेअर बाजारात २२९ अंशाची घसरण: 'या' कारणाने बसला गुंतवणूकदारांना फटका
दरम्यान, निर्मला सीतारामन यांनी २० सप्टेंबरला कॉर्पोरेट कर हा ३० टक्क्यांवरून २२ टक्के करण्याची घोषणा केली होती.