नवी दिल्ली - दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या एनडीए सरकारने पहिल्यांदाच सचिव पातळीवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. केंद्रीय वित्तीय सचिव सुभाष चंद्रा गर्ग यांची ऊर्जा मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. तर डीआयपीएएम विभागाच्या सचिवपदी कार्यरत असलेल्या अतनु चक्रवर्ती यांची अर्थव्यवहार सचिवपदी नियुक्ती केली आहे आणि ऊर्जा मंत्रालयाचे सचिव अजय कुमार भल्ला यांची ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी (ओएसडी) म्हणून गृह मंत्रालयात नियुक्ती करण्यात आली आहे.
एनडीए सरकारने अजय कुमार भल्ला यांची गृहसचिवपदी नियुक्ती केली असून 31 ऑगस्टला राजीव गौबा सेवानिवृत्त झाल्यानंतर भल्ला पदभार स्वीकारतील. अजय कुमार भल्ला आसान मेघालयाचे 1984 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. भल्ला ऑगस्ट 2021 पर्यंत म्हणजे दोन वर्ष केंद्रीय गृहसचिव पदावर असतील.
सद्य स्थितीत काश्मीरमध्ये दहशतवादी मुद्दा गंभीर आहे. हाच मुद्दा भल्ला यांच्या समोरील मोठे आव्हान असेल. आसामच्या एका अधिकारीने सांगितले की, भल्ला यांचा प्रशासकीय अनुभव दांडगा आहे. त्यांनी आसाममध्ये खूप चांगल्या पध्दतीने प्रशासन चालवले आहे. यामुळे भल्ला केंद्रीय गृहसचिव पद उत्तमरित्या हाताळतील, असे त्या अधिकारीने सांगितलं.
अजय कुमार भल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रिपोर्ट करतील. गृहमंत्रालयाने सद्या नविन टीम तयार केली असून गुप्तचर विभागाचे नविन संचालक अरविंद कुमार, रॉ चे प्रमुख सामंत कुमार गोयल यांच्यासह अजय कुमार भल्ला या टीमचे नेतृत्व करतील.
दरम्यान, वित्तीय सचिव हे अधिकारी वर्तुळातील अत्यंत महत्त्वाचे पद मानले जाते. या पदावर सहसा अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येते. यापूर्वी सत्तेत आल्यानंतरही मोदी सरकारने 2014 मध्ये वित्तीय सचिव अरविंद मय्याम यांची पर्यटन विभागात बदली केली होती.