नवी दिल्ली – जर ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतरणाची समस्या सोडविली नाही, तर देशाच्या विकासदरावर परिणाम होईल, अशी शक्यता अब्जाधीश गौतम अदानी यांनी व्यक्त केली होती. हा प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक लोकसंख्येला स्थानिक परिसरात रोजगार देण्याचे प्रारुप (मॉडेल) विकसित करावे, अशी अदानी यांनी अपेक्षा व्यक्त केली. ते गुजरातमधील इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंटमध्ये बोलत होते.
अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले, की कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी क्लस्टरवर आधारित धोरण आणि डिजीटल टेक्नॉलिजी अवलंब करण्यात यावा. देशातील स्थलांतरित कामगारांची संख्या 100 दशलक्षहून अधिक झाली आहे. चारपैकी एक कामगार हा स्थलांतरित आहे. काही ठिकाणी स्थलांतरण हे फायदेशीर आहे. मात्र, शहरी व ग्रामीण असंतुलन हे संधीमधील असमानता दाखविते. त्यावर मात करण्याची गरज असल्याचेही अदानी म्हणाले.
पुढे अदानी म्हणाले, की कोट्यवधी स्थलांतरित मजूर हे कोरोनाच्या संकटात त्यांच्या गावी परत असल्याचे चित्र तुमच्या लक्षात असेल. स्थानिक पातळीवर रोजगार मिळण्याचे ग्रामीण अर्थव्यवस्थेत प्रारुप आपण तयार केले पाहिजे. कोरोनाच्या संकटामुळे आपल्याला स्थानिक विकासाच्या प्रारुपावर पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.