नवी दिल्ली - जगात सर्वाधिक वाईट पद्धतीने कामगिरी करणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी भारताची अर्थव्यवस्था असल्याचे मत नोबेल पारितोषिक विजेते अभिजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केले. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारने दिलेले पॅकेज अपुरे असल्याचेही बॅनर्जी यांनी म्हटले. ते एका ऑनलाइन कार्यक्रमात बोलत होते.
देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत वाढेल, असा विश्वास अभिजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केला. अर्थतज्ज्ञ बॅनर्जी म्हणाले की, कोरोना महामारीपूर्वीच्या काळातही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरला होता. पुढील आर्थिक वर्षात चालू वर्षाच्या तुलनेत आर्थिक विकासदर वाढेल, असा बॅनर्जी यांनी अंदाज व्यक्त केला.
सरकारचे पॅकेज अपुरे-
भारताचे अर्थव्यवस्थेला चालना देणारे पॅकेज हे मर्यादित आहे. ते बँकांसाठी पॅकेज होते. मला वाटते, आपण त्याहून अधिक चांगले करू शकलो असतो. प्रोत्साहन देणाऱ्या उपाययोजनांमुळे कमी उत्पन्न गटातील लोकांच्या क्रयशक्तीत वाढ होणार नाही. सरकारला कमी उत्पन्न असलेल्या लोकसंख्येच्या हातात पैसे देण्याची इच्छा नाही.
आत्मनिर्भरची कल्पना चुकीची-
आरबीआयसह केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०.९७ लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. त्यावेळी सरकारकडून आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा करण्यात आली होती. त्याबाबत अभिजीत बॅनर्जी म्हणाले की, आत्मनिर्भर हा शब्द अत्यंत काळजीपूर्वक वापरला पाहिजे. देशामधूनच माल खरेदी करण्याचा प्रयत्न करणे, ही आत्मनिर्भरमधील समस्या आहे. ती चुकीची कल्पना आहे. आम्ही कोणत्या तरी वस्तूंच्या उत्पादनासाठी विशेष असणे आवश्यक आहे. जे गरजेचे आहे, ते आयात करायलाच हवे. छोट्या आंत्रेप्रेन्युअरसाठी आपण खरोखर पायाभूत सुविधा तयार केल्या नाहीत. जगाच्या तुलनेत आपण अधिक स्पर्धात्मक तयार राहण्याची गरज असल्याचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी सांगितले.
दरम्यान, चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा विकासदर हा २३.९ टक्क्यांनी घसरला आहे. गोल्डमॅन सॅच्सच्या अंदाजानुसार वर्ष २०२०-२१ मध्ये जीडीपी हा १४.८ टक्क्यांनी घसरणार आहे.