मुंबई - आर्थिक संकटात सापडलेली येस बँक सावरत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून घेतलेले स्पेशल लिक्विडिटी फॅसिलिटीचे (एसएलएफ) ५० हजार कोटी रुपये येस बँकेने परत केले आहेत. ही माहिती येस बँकेचे चेअरमन सुनिल मेहता यांनी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत दिली आहे.
आर्थिक वर्ष २०२०-२१ हे बँकेसाठी स्थित्यंतराचे असणार आहे, असे येस बँकेचे चेअरमन सुनिल मेहता यांनी सांगितले. केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेच्या संचालक रद्द करून सर्व नवीन संचालक मार्चमध्ये नियुक्त केले आहेत. त्यानंतर ठेवीदारांना पैसे काढण्यासाठी काही दिवस निर्बंध लागू केले होते.
येस बँकेत नवीन व्यवस्थापन कार्यरत झाल्यानंतर आरबीआयने येस बँकेचे निर्बंध काढले होते. कोरोनाच्या संकटात येस बँकेने १५ हजार कोटी रुपये उभे केले होते. त्यामुळे बँकेला पुन्हा कर्ज देण्याची सेवा सुरू करणे शक्य झाले आहे. येस बँकेची ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण बैठक गुरुवारी घेण्यात आली. यामध्ये बोलताना सुनिल मेहता म्हणाले, की आरबीआयचे सर्व ५० हजार कोटी रुपये ८ सप्टेंबरला परत केले आहेत. हे सांगताना आनंद होत आहे. अंतिम मुदतीपूर्वी आरबीआयचे येस बँकेने पैसे दिले आहेत.
आपण आरोग्य आणि कोरोनाच्या आर्थिक परिणांमाशी लढत आहोत. त्याचवेळी स्वत:ला नव्याने शोधत आहोत. बळकट प्रशासन हे शाश्वत विकासाच्या तीन मुख्य आधारस्तंभापैकी आहे. त्यावर बँक काम करत आहे. दरम्यान, येस बँकेच्या प्रशासकीस कारभारात त्रुटी असल्याने बँकेला तोटा सहन करावा लागल्याचा यापूर्वी दावा करण्यात आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानेही येस बँकेला १० हजार कोटींचे मदतीचे पॅकेज दिले होते.