नवी दिल्ली - जर सरकारने दिलासा दिला नाही तर व्होडाफोन आयडिया बंद होईल, असे कंपनीचे चेअरमन कुमारमंगलम बिर्ला यांनी म्हटले आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
जर सरकारने दिलासा दिला नाही तर कंपनी काय कृती करणार आहे, असा बिर्ला यांना माध्यमांनी प्रश्न विचाला. तेव्हा त्यांनी आम्हाला दुकान बंद करावे लागेल, असे विधान केले. पुढे ते म्हणाले, सरकारकडून दिलासा मिळाला नाही तर ग्रुपकडून कंपनीत गुंतवणूक करण्यात येणार नाही. चांगल्या पैशाने वाईट पैशाच्या (बॅड मनी) मार्गाने जावे, यात काहीही अर्थ नाही. सरकारकडून दिलासा मिळाला नाही तर कंपनीपुढे नादारीच्या (इन्सॉलव्हन्सी) मार्गाचा पर्याय असल्याचेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा-कांदे भाववाढीवर विरोधक आक्रमक; जाणून घ्या, कोण काय म्हणाले?
व्होडाफोन आयडिया आहे आर्थिक तोट्यात-
सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना थकित रक्कम भरण्याची ऑक्टोबरमध्ये तीन महिन्यांची मुदत दिली होती. या आदेशानुसार पैसे वसूल करण्यासाठी दूरसंचार विभागाने थकित पैसे भरण्याची दूरसंचार कंपन्यांना नोव्हेंबरमध्ये नोटीस दिली आहे. या नोटीसप्रमाणे व्होडाफोन आयडियाला ५४ हजार १८३.९ कोटी रुपये केंद्रीय दूरसंचार विभागाला द्यावे लागणार आहेत. व्होडाफोन-आयडिया कंपनी ही चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सर्वाधिक तोटा झालेली भारतीय कंपनी ठरली आहे. दुसऱ्या तिमाहीत सप्टेंबरअखेर व्होडाफोन-आयडियाला ५० हजार ९२१ कोटींचा तोटा झाला. सरकारकडून दिलासा मिळण्यावरच कंपनीचे पुढील नियोजन असणार असल्याचेही कंपनीने यापूर्वीच म्हटले आहे.
हेही वाचा-सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे थकित रक्कम भरा; सरकारची दूरसंचार कंपन्यांना नोटीस