नवी दिल्ली - आयसीआयसी बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांची ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यातून सुटका होत नसल्याचे स्पष्ट चित्र आहे. त्यांना आर्थिक अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) १० जूनला दिल्लीत कार्यालयात हजर राहण्याची नोटीस पाठविली आहे. व्हिडिओकॉनला १ हजार ८७५ कोटी रुपयांचे कर्ज वाटपात गैरप्रकार केल्याचा कोचर यांच्यावर आरोप आहे.
नवी दिल्लीतील जामनगर येथील ईडीच्या कार्यालयात कोचर यांना १० जूनला सकाळी साडेदहा वाजता उपस्थित राहावे लागणार आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात पाचवेळा ईडीने कोचर यांची दिल्लीतील कार्यालयात चौकशी केली आहे.
आयसीआयसी बँकेने व्हिडिओकॉनला १ हजार ८७५ कोटींचे कर्ज दिले होते. त्यामध्ये चंदा कोचर यांनी गैरप्रकार केल्याचा ईडीला संशय आहे. हे कर्ज व्हिडिओकॉन ग्रुपला २००९ आणि २०११ मध्ये देण्यात आले होते.
मार्चमध्ये ईडीने कोचर यांचे कार्यालय आणि राहत्या घराची झडती केली होती. त्याचबरोबर व्हिडिओकॉन ग्रुपचे वेणुगोपाल धूत यांचीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. व्हिडिओकॉन ग्रुपला आयसीआयसी बँकेने २०१७ अखेर एकूण ४० हजार कोटींचे कर्ज दिले. त्यापैकी २ हजार ८१० कोटींचे कर्ज हे अनुत्पादित कर्ज (एनपीए) म्हणून घोषित करण्यात आले आहे.