चेन्नई - कोरोना महामारीत आर्थिक गुंतवणुकीसाठी बहुतांश राज्य सरकार प्रयत्नशील असताना तामिळनाडू सरकारला मोठे यश मिळाले आहे. टाटा ग्रुप तामिळनाडूमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या सुट्ट्या भागांचे उत्पादन करणारा कारखाना सुरू करणार आहे. या प्रकल्पासाठी टाटा ग्रुपकडून ५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
टाटा ग्रुपचा ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचा कारखाना सुरू होणार असल्याचे सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. हा कारखाना होसूर जिल्ह्यातील कृष्णनगरी जिल्ह्यात सुरू होणार आहे. या कारखान्याच्या कामाचे आज भूमीपुजन करण्यात आले आहे. हा प्रकल्प ५०० एकरामध्ये असणार आहे.
कारखान्यात १८ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार नोकऱ्या-
टाटाचा प्रकल्प हा जीएमआर कृष्णनगर एसआयआर (विशेष गुंतवणूक क्षेत्र) आणि तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळ आणि जीएमआर ग्रुप यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू करण्यात येत आहे. कोईम्बुतरस्थित जीकेडी इन्स्टिट्यूट फॉर टेक्नॉलिजिकल रिसोर्सेसच्या (जीकेडीआयटीआर) माहितीनुसार टाटा कारखाना हा ९० टक्के महिलांसाठी असणार आहे. टाटा ग्रुपकडून या कारखान्यात इलेक्ट्रॉनिक उद्योगासाठी मॅकेनॅकिलचे सुट्टे भाग उत्पादित करण्यात येणार आहेत. यामध्ये २०२१ पर्यंत १८ हजार कर्मचारी नियुक्त करण्याचे टाटा ग्रुपचे नियोजन आहे.