सॅनफ्रान्सिस्को - सृजनशील कामाने छाप टाकणारे अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्सची सही असलेले पोस्टर लॉस एंजिलिसमध्ये विकण्यात आले. या पोस्टरला २१ लाख ८७ हजार ५०० (३१ हजार २५० डॉलर) रुपये किंमत मिळाली आहे.
पिक्सार अॅनिमेशन स्टुडिओजने टॉय स्टोरी हा १९९५ मध्ये सिनेमा प्रदर्शित केला होता. त्यानंतर स्टीव्ह जॉब्सने पोस्टरची सही केली असावी, असा अंदाज करण्यात येत आहे. जॉब्स यांची सही असल्यानेच ३१ हजार २५० डॉलर एवढी किंमत पोस्टरला मिळाल्याचे अमेरिकतील माध्यमाने म्हटले आहे. हे पोस्टर केवळ २४ X ३६ इंचाचे आहे.
यापूर्वी स्टीव्ह जॉब्सची सही असलेले नेटवर्ल्डचे पोस्टर २०१७ मध्ये सॅनफ्रान्सिस्कोमध्ये विकण्यात आले होते. तेव्हा त्या पोस्टरला १९ हजार ६४० डॉलर एवढी किंमत मिळाली होती. ही माहिती नेट डी. सँडर्स ऑक्शनने दिली आहे.
जॉब्स यांची पिक्सारमध्ये मोठी हिस्सेदारी होती. ते टॉय स्टोरी सिनेमाचे कार्यकारी निर्माता होते. त्यानंतर पिक्सारची मालकी डिस्ने कंपनीने घेतली आहे. जॉब्स यांनी डिस्नेच्या संचालक मंडळावरही काम केले होते.
टॉय स्टोरीला तीनदा अॅकडमी अॅवार्डसाठी नामांकन मिळाले होते. तर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३७६.६ दशलक्ष डॉलरची कमाई केली होती. आजपर्यंतच्या सर्वात चांगल्या अॅनिमेशन सिनेमामध्ये टॉय स्टोरीची गणना होते.