नवी दिल्ली - राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद प्राधिकरणाने सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या चेअरमन पदावर नियुक्ती करणारा आज निकाल दिला आहे. हा निकाल म्हणजे आपली भूमिका योग्य आहे, हे सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया सायरस मिस्त्री यांनी दिली. शेअर धारकांचे संरक्षण करण्यासाठी सशक्त प्रशासनाची रचना करण्याची त्यांनी मागणी केली.
टाटा सन्स संचालक मंडळाने २४ ऑक्टोबर २०१६ ला सायरस मिस्त्री यांना चेअमन पदावरून काढून टाकले होते. त्यांच्याजागी रतन टाटा यांची हंगामी चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
संबंधित बातमी वाचा-सायरस मिस्त्री पुन्हा टाटा सन्सचे चेअरमन; एनएसीएलएटीचा निकाल
सायरस मिस्त्री म्हणाले, आजचा निकाल हा माझा वैयक्तिक विजय नाही. हा चांगले प्रशासन असण्याच्या मुलभूत तत्वाचा आणि कमी संख्येतील शेअरधारकांच्या अधिकारांचा विजय आहे. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ मिस्त्री कुटुंबाकडे कमी शेअर राहिले आहेत. संस्थेचे चांगले पालक म्हणून काम करण्यासाठी आम्ही कठोर प्रयत्न केले आहेत. त्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, अशी त्यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली. कोणताही इशारा न देता अथवा कारणाशिवाय चेअरमनपदावरून काढून टाकण्यात आले, असा त्यांनी दावा केला.
हेही वाचा-जीएसटी समिती : देशातील लॉटरीवर एकसमान दर लागू करण्याबाबत एकमत
टाटा सन्सच्या कार्यकारी चेअरमनपदी एन. चंद्रशेखरन यांची करण्यात आलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचेही एनसीएलएटीने म्हटले आहे. मात्र, सायरस यांची नियुक्ती ही चार आठवड्यानंतर होणार असल्याचे प्राधिकरणाने निकालात म्हटले आहे. ही मुदत टाटा सन्सला याचिका दाखल करण्यासाठी देण्यात आलेली आहे.