नवी दिल्ली – आर्थिक संकटात असलेल्या विमान कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना व सवलती देण्यास सुरुवात केली आहे. स्पाईसजेटने नियमितपणे विमान प्रवास करणाऱ्यांसाठी 'स्पाईसजेट क्लब' ही योजना सुरू केली आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रवाशांना तिकीट खरेदीवर रिवार्ड पाँईट देणार आहेत. या रिवार्ड पाँईटमधून प्रवाशांना तिकीट खरेदीत सवलत मिळणार आहे.
'स्पाईसजेट क्लब'मधील सदस्याला एका रिवार्डमागे 50 पैसे मिळणार असल्याचे स्पाईसजेटने सांगितले. तर 100 रुपयांमागे स्पाईसजेट प्रवाशांना 10 रिवार्ड पाईंट देणार आहे. स्पाईसजेटने क्लासिक, सिलव्हर, गोल्ड आणि प्लॅटिनियम या प्रकारात स्पाईस क्लब सुरू केला आहे. सिलव्हर श्रेणीमधील ग्राहकांना चेक इन आणि बोर्डिंग सेवेमध्ये प्राधान्य मिळणार आहे. तर स्पाईसमॅकच्या अद्ययावतीकरणासाठी 20 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. तर बोनस म्हणून 250 रिवार्ड पाँईट हे तिकीट बुकिंगवर दिले जाणार आहेत.
स्पाईसजेटचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह म्हणाले, की स्पाईसक्लब कार्यक्रमातून मोफत अन्न, तिकीट रद्द करण्यावर शुल्क माफ असे विविध लाभ प्रवाशांना देण्यात येणार आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या संसर्गामुळे देशातील विमान वाहतूक सेवा दोन महिने बंद होती. देशात 25 मे पासून विमान वाहतूक सेवा सुरू करण्यात आली. मात्र, आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा ही 23 मार्चपासून बंद राहिली आहे.