नवी दिल्ली - पीएमसीच्या खातेदारांच्या संदर्भातील याचिकेची तातडीने सुनावणी घेण्याकरिता सर्वोच्च न्यायालयाने आज मंजुरी दिली आहे. घोटाळा झालेल्या पीएमसीमध्ये सुमारे १५ लाख ग्राहकांचे पैसे अडकले आहेत.
दिल्लीच्या बेजोन कुमार मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नागरिकांनी कष्ट करून विविध सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकेत पैसे जमा केले आहेत. हे पैसे सुरक्षित राहण्यासाठी केंद्र सरकार आणि आरबीआयला सूचना दिल्या जाव्यात, अशी याचिकेतून मागणी करण्यात आली आहे. ग्राहकांच्या बँकेतील जमा रकमेला १०० टक्के विमा देण्यासारख्या उपाययोजना कराव्यात, अशी याचिकाकर्त्याने मागणी केली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने पीएमसीमधील सुमारे ४ हजार ३५५ कोटींचा घोटाळा उघडकीला आल्यानंतर निर्बंध लागू केले आहेत. ग्राहकांना सहा महिन्यातून एकदाच ४० हजार रुपयापर्यंत पैसे काढण्याची आरबीआयने मर्यादा घालून दिलेली आहे. बँकेतून पैसे काढता येत नसल्याच्या तणावातून दोन खातेदारांचा ह्रदय बंद पडून मृत्यू झाला आहे. तर एका खातेदाराने आत्महत्या केली आहे.