नवी दिल्ली – अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा जगातील आघाडीच्या 100 कंपन्यांमध्ये समावेश झाला आहे. ही यादी ‘फोर्च्यून ग्लोबल 500’नावाने प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ऑईल ते दूरसंचार क्षेत्रात काम करणाऱ्या रिलायन्सचा फोर्च्यूनच्या 2020 च्या यादीत 96 वा क्रमांक आला आहे. या यादीत भारतामधून रिलायन्सचा सर्वाधिक वरचा क्रमांक आहे.
रिलायन्सचा 2012 मध्ये फोर्च्यूनच्या यादीमध्ये 99 वा क्रमांक होता. मात्र, हा क्रमांक घसरून 2015 मध्ये 215 वा झाला. त्यानंतर कंपनीचे यादीतील क्रमांक हळूहळू सुधारत गेला आहे.
असे आहेत देशातील कंपन्यांचे फोर्च्यून 500 यादीतील क्रमांक
- सरकारी कंपनी इंडिया ऑईल कॉर्पोरेशनचा यादीमधील क्रमांक 34 ने घसरून 150 वा क्रमांक आला आहे. नॅचरल गॅस कॉर्पोरेशनचा 190 वा क्रमांक आहे. गतवर्षीच्या यादीच्या तुलनेत नॅचरल गॅसचा क्रमांक 30 ने घसरला आहे.
- स्टेट बँक ऑफ इंडियाचा यादीमधील क्रमांक 15 ने सुधारून 221 वा आला आहे.
- भारत पेट्रोलियमचा 309 वा, टाटा मोटर्सचा 337 वा तर राजेश एक्सपोर्ट्सचा 462 वा क्रमांक आहे.
फोर्च्यून यादीमधील कंपन्यांचा समावेश हा 31 मार्च 2020 पर्यंतच्या उत्पन्नावरून करण्यात येतो. रिलायन्सने 86.2 अब्ज डॉलर, इंडियन ऑईलने 69.2 अब्ज डॉलर, ओएनजीसीने 56 अब्ज डॉलर तर स्टेट बँकेने 51 अब्ज डॉलरचे मागील आर्थिक वर्षात उत्पन्न मिळविले आहे.
अशी आहेत फोर्च्यून 500 यादीमधील आघाडीच्या कंपन्यांची नावे
- फोर्च्यूनच्या यादीत 524 अब्ज डॉलरचे उत्पन्न मिळविणारी वॉलमार्ट पहिल्या क्रमांकवर आहे. तर त्यानंतर तीनही कंपन्या चीनच्या आहेत.
- सिनोपेक ग्रुप 407 अब्ज डॉलरचे उत्पन्न मिळविणारी दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- तिसऱ्या क्रमांकावर स्टेट ग्रीड (384 अब्ज डॉलर) आणि चौथ्या क्रमांकावर चायना नॅशनल पेट्रोलियम (379 अब्ज डॉलर) कंपनी आहे.
- पाचव्या क्रमांकावर रॉयल डच शेल आणि सहाव्या क्रमांकावर सौदी अॅरेम्को कंपनी आहे