नवी दिल्ली - बजाज ऑटोमध्ये चेअरमनपद दीर्घकाळापासून भूषविणारे राहुल बजाज हे कार्यकारी पदावरून पायउतार होणार आहेत. यापुढे ते अकार्यकारी संचालक म्हणून भूमिका बजाविणार असल्याचे बजाज ऑटो कंपनीने म्हटले आहे.
राहुल बजाज हे बजाज ऑटोमध्ये १ एप्रिल १९७० पासून संचालक आहेत. कंपनीमध्ये त्यांची शेवटची पुनर्नियुक्ती १ एप्रिल २०१५ मध्ये संचालक मंडळावर करण्यात आली होती. त्यांची कार्यकारी चेअरमन म्हणून ३१ मार्च २०२० ला मुदत संपत असल्याची माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे. काही दिलेली वचने आणि इतर कारणांनी राहुल यांनी ३१ मार्च २०२० नंतर पूर्णवेळ संचालक म्हणून काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - निवृत्ती वेतनाचा बोझा; रेल्वेने वित्त मंत्रालयाकडे 'ही' केली मागणी
कंपनीच्या संचालक मंडळाने राहुल बजाज यांची अकार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. राहुल यांनी बजाज ग्रुपची १९६५ मध्ये धुरा स्वीकारल्यानंतर त्यांनी कंपनीला प्रगतीपथावर नेले. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने केवळ ७.२ कोटी ते १२ हजार कोटी रुपयांची उलाढाल असा प्रवास केला आहे. देशाची अर्थव्यवस्था खुली होत असताना त्यांनी बजाजचा ब्रँड हा जागतिक बाजारातही यशस्वीपणे नेला.
हेही वाचा - अर्थसंकल्प २०२० : कृषी क्षेत्राला हवी आहे अधिक गुंतवणूक