मुंबई - बँक कर्मचारी संघटनेने २२ ऑक्टोबरला संप पुकारला आहे. या संपाचा बँकेच्या कामकाजावर परिणाम होईल, अशी शक्यता बँक ऑफ बडोदाने व्यक्त केली आहे. संपादरम्यान सर्व बँक शाखांमध्ये कामकाज सुरळीत चालू राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बँक ऑफ बडोदाकडून सांगण्यात आले आहे.
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए) आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाने (बीईएफआय) विविध मागण्यांसाठी २२ ऑक्टोबरला संप पुकारला आहे. हा संप सरकारी बँकांच्या विलिनीकरणाच्या विरोधात करण्यात येणार आहे. सरकारी बँकांचे विलिनीकरण करण्याच्या निर्णयाला विरोध म्हणून संप करण्यात येणार आहे. सरकारचा हा निर्णय सर्वात दुर्दैवी आणि पूर्णपणे अविश्वसनीय असल्याचे एआयटीयूसीने म्हटले आहे.
बँक कर्मचाऱ्यांच्या २२ ऑक्टोबरच्या संपाला एआयटीयूसीचा पाठिंबा
बँक ऑफ बडोदा आणि एसबीआयचे विलिनीकरणाने कोणताही फायदा झाल्याचे दिसून आले नाही. अर्थव्यवस्थेत गोंधळ आणि संकट असताना बँकांच्या विलिनीकरणाचा प्रयोग करण्याची ही योग्य वेळ नाही. बँकांचे विलिनीकरण हे चुकीच्या उद्देशाने आणि चुकीच्या वेळी करण्यात येत आहे. अशा वेळी संघर्ष करणाऱ्या एआयबीईए आणि बीईएफआयचे कौतुक करत असल्याचे एआयटीयूसी म्हटले आहे. त्यांच्या संपाला पाठिंबा देत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.