नवी दिल्ली - एअर इंडियाकडे सरकारी तेल कंपन्यांचे ५ हजार कोटी थकलेले आहेत. त्या थकबाकीपोटी दर महिन्याला १०० कोटी रुपयांची थकबाकी देण्यात येईल, असे सरकारी तेल कंपन्यांना एअर इंडियाने आश्वासन देण्यात आले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने सरकारी तेल कंपन्यांनी एअर इंडियाचे विमान इंधन थांबविण्याचा इशारा दिला आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे (वित्त) संचालक संदिप कुमार गुप्ता म्हणाले, एअर इंडियाने जून आणि सप्टेंबरमध्ये तीन सरकारी तेल कंपन्यांना दर महिन्याला १०० कोटी देणार असल्याचे म्हटले होते. मात्र दुर्देवाने त्यांनी वचन पाळले नाही. इंडियन ऑईल कंपनीसह भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने एअर इंडियाला थकित रकमेविषयी नोटीस पाठविली आहे. जर देयक देण्यात आले नाही तर विमान इंधनाचा पुरवठा थांबवणे भाग पडेल, असे त्यांनी म्हटले. त्यासाठी एअर इंडियाला १८ ऑक्टोबरची अंतिम मुदत देण्यात आल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
एअर इंडियाने इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे २ हजार ७०० कोटी रुपये थकविले आहेत. त्यामध्ये ४५० कोटींच्या व्याजाचा समावेश आहे. एअर इंडियाकडे तीनही तेल कंपन्यांचे व्याजासह ५ हजार कोटी रुपये थकले आहेत. यापूर्वी सरकारी तेल कंपन्यांनी सहा विमानतळावरून एअर इंडियाला देण्यात येणाऱ्या विमान इंधनाचा पुरवठा थांबविला होता.