नवी दिल्ली - टाटा ग्रुपचे माजी चेअरमन रतन टाटा यांनी मध्यमवर्गीयांची कार म्हणून स्वप्न पाहिलेल्या नॅनोला घरघर लागली आहे. टाटा मोटर्सने पहिल्या नऊ महिन्यात नॅनोचे उत्पादन घेतले नाही. तर फेब्रुवारीत एकाच नॅनोची विक्री झाली आहे.
देशातील बाजारपेठेत सप्टेंबरपर्यंत नॅनोचे उत्पादन घेण्यात आले नाही. तर एका वाहनाची विक्री झाल्याची नोंद झाल्याची माहिची टाटा मोटर्सने शेअर बाजाराला दिली आहे. टाटा मोटर्सने एप्रिल २०२० पासून नॅनोचे उत्पादन थांबविण्यात येईल, असे संकेत दिले आहेत. पुढील वर्षांपासून प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी चारचाकी इंजिन हे बीएस-६ क्षमतेचे असणे केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. कंपनीने नव्या इंजिनाप्रमाणे उत्पादन न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.
हेही वाचा - सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे उपाध्यक्ष भारतात; पंतप्रधानांसह मुकेश अंबानींची भेट घेण्याची शक्यता
नॅनोचे जानेवारी २००८ मध्ये ऑटो प्रदर्शनात अनावरण करण्यात आले होते. तर मार्च २००९ मध्ये नॅनोचा बाजारात शुभारंभ करण्यात आला होता. वाहन उद्योगात कच्च्या मालासह इतर गोष्टींचे दर वाढूनही सुरुवातीला नॅनोची फक्त १ लाख रुपये किंमत होती. त्यावेळी रतन टाटा यांनी 'वचन म्हणजे वचन' असे म्हणत टाटाची विश्वसनीयता दाखवून दिली होती. नॅनोच्या विक्रीत सातत्याने घसरण होत गेली. टाटा मोटर्सने जानेवारी-सप्टेंबर २०१८ दरम्यान २९७ नॅनोचे उत्पादन घेतले. तर देशातील बाजारपेठेत २९९ नॅनोची विक्री झाली होती.
हेही वाचा-स्विस बँकेतील भारतीय खातेदारांची देशाला मिळाली पहिली यादी, पण...
सुरुवातीपासून नॅनो प्रकल्पासमोर आल्या अडचणी -
टाटा मोटर्सचा पश्चिम बंगालच्या सिंगूरचा येथील नॅनो प्रकल्प अडचणीत सापडला. त्यानंतर कंपनीने गुजरातमधील सदानंद येथे प्रकल्प हलविला. ग्राहकांनी खरेदी केलेल्या नॅनोला पेट घेण्याच्या घटना समोर आल्या होत्या. दरम्यान, सर्वात स्वस्तामधील कार अशा पद्धतीने नॅनोची जाहिरात करणे चूक होती, असे टाटा यांनी कबूल केले होते.