नवी दिल्ली – तंत्रज्ञानातील आघाडीची कंपनी मायक्रोसॉफ्ट इंडिया ही कर्मचाऱ्यांसाठी सर्वाधिक आकर्षक कंपनी ठरली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सॅमसंग इंडिया तर तिसऱ्या क्रमांकावर अमेझॉन इंडिया असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे.
रँडस्टॅड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्चच्या (आरईबीआर) सर्वेक्षणानुसार वित्तीय आरोग्य, उच्च प्रतिष्ठा आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये मायक्रोसॉफ्ट इंडियाला सर्वाधिक गुण मिळाले आहेत.
आरईबीआरच्या सर्वेक्षणानुसार काम आणि जीवनातील संतुलनाला कर्मचाऱ्यांनी सर्वाधिक 43 टक्के प्राधान्य दिले आहे. त्यानंतर आकर्षक वेतन आणि मिळणाऱ्या फायद्यांना 41 टक्के तर नोकरीमधील सुरक्षिततेला कर्मचाऱ्यांनी 40 टक्के प्राधान्य दिल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. सर्वेक्षणातील 69 टक्के कर्मचाऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून कंपनीत असल्याचे म्हटले आहे.
देशामध्ये कर्मचाऱ्यांकरता सर्वाधिक आकर्षक असलेल्या कंपन्यांमध्ये इन्फोसिस टेक्नॉलॉजिसचा चौथा, मर्सिडीज बेन्झचा पाचवा, सोनीचा सहावा, आयबीएमचा सातवा, डेल टेक्नॉलॉजीसचा आठवा, आयटीसीचा नववा तर टाटा कन्सल्टन्सीचा 10 वा क्रमांक आला आहे.
अॅपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट सर्वात मूल्य असलेले ब्रँड
अॅपल ही सर्वात मूल्यवान ब्रँड असलेली कंपनी फोर्ब्सच्या यादीत ठरली आहे. अॅपलचे मूल्य हे 17 टक्क्यांनी वाढून 241.2 अब्ज डॉलर झाले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गुगलच्या ब्रँडचे मूल्य हे 24 टक्क्यांनी वाढून 207.5 अब्ज डॉलर झाले आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मायक्रोसॉफ्टचे मूल्य हे 30 टक्क्यांनी वाढून 163 अब्ज डॉलर झाले आहे. सर्वाधिक ब्रँडचे मूल्य असलेल्या पहिल्या 100 कंपन्यांमध्ये 50 अमेरिकन कंपन्यांचा समावेश आहे.