नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक असलेल्या मारुती सुझुकी इंडियाने वाहनाच्या किमतीमध्ये पुढील महिन्यापासून वाढ करणार असल्याचे जाहीर केले आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने ही दरवाढ करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
गतवर्षी कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने वाहनांच्या किमतीवर परिणाम झाला होता, असे मारुती सुझुकीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. त्यामुळे किमतीचा वाढलेला अतिरिक्त भार ग्राहकांवर सोपवावा लागणे अपरिहार्य झाले आहे. वाहनांच्या किमती एप्रिल २०२१ मध्ये वाढणार असल्याचे मारुती सुझुकीने म्हटले आहे. या किमती मॉडेलनुसार वेगवेगळ्या असणार आहेत. मात्र, निश्चितपणे किती किमती वाढणार आहेत, याची कंपनीने माहिती दिलेली नाही.
हेही वाचा-विरशो बायोटेक स्पुटनिक व्हीच्या २० कोटी लशींचे करणार उत्पादन
- मारुती सुझुकीकडून २.९९ लाख किमतीच्या (एक्स शोरुम दिल्ली) हॅचबॅक ते १२.३९ लाख किमतीच्या (एक्स शोरुम दिल्ली)एस-क्रॉस क्रोसओव्हरची विक्री करण्यात येते.
- मागील महिन्यात टाटा मोटर्स, इसुझु मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि बीएमडब्ल्यूने वाहनांच्या किमती वाढविल्या आहेत. उदाहरणार्थ १८ जानेवारीला मारुतीने निवडक मॉडेलच्या किमती ३४ हजार रुपयापर्यंत वाढविल्या होत्या.
- वाहन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार स्टील आणि सेमीकंडक्टरचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे मारुतीला वाहनांच्या किमती वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.
- फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या (एफएडीए) माहितीनुसार मारुती सुझुकी हे प्रवासी वाहनांमधील आघाडीची कंपनी आहे. गेल्या महिन्यात कंपनीने सुमारे १.१९ लाख प्रवासी वाहनांची विक्री केली होती. प्रवासी वाहनांच्या विक्रीत मारुतीचा एकूण बाजारपेठेत ४७ टक्के हिस्सा आहे.