नवी दिल्ली - वाहन उद्योग तीव्र मंदीतून जात असतानाच महिंद्रा अँड महिंद्रानेही उत्पादन प्रकल्प काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने ८ ते १४ दिवस चालू तिमाहीदरम्यान उत्पादन थांबविण्याचा शुक्रवारी निर्णय घेतला आहे. मागणी व उत्पादन याचा मेळ घालण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
एम अँड एम ८ ते १४ दिवस वाहनांचे कोणतेही उत्पादन घेणार नाही, असे कंपनीने म्हटले आहे. एम अँड एमचे उत्पादन गतवर्षीच्या तुलने एप्रिल-जुलै तिमाहीदरम्यान ८ टक्क्याने घसरले होते. कंपनीच्या वाहनांची निर्यातीसह एकूण विक्री ८ टक्क्याने कमी झाली आहे. बाजारामधील वाहनांच्या उपलब्धतेवर कोणताही परिणाम होणार असल्याने एम अँड एमने म्हटले आहे. बाजारामध्ये वाहनांची पुरेशी संख्या असल्याचे कंपनीने म्हटले आहे. महिंद्राच्या वाहनांची जुलैमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १६ टक्क्यांनी विक्री घसरली होती.
महिंद्राचे उत्पादन प्रकल्प जुनमध्ये ५ ते १३ दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले होते.
वाहन उद्योगात मंदी -
कधी नव्हे तेवढ्या प्रमाणात वाहन उद्योग हा मंदीला सामोरे जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्व प्रकारच्या वाहनांच्या विक्रीत घसरण झाल्याचे एसीएमएचे अध्यक्ष राम वेंकटरमनी यांनी सांगितले. वाहन उद्योगावरच वाहनांचे सुट्टे भाग निर्माण करणाऱ्या उद्योगाची प्रगती अवलंबून असते. सध्या १५ ते २० टक्के वाहनांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर १० लाख जणांना नोकऱ्या गमवाव्या लागतील, अशी त्यांनी भीती व्यक्त केली.