नवी दिल्ली - लक्ष्मी विलास बँकेच्या ग्राहकांना डीबीएसमधून सर्व सेवा घेता येणार आहेत. लक्ष्मी विलास बँकेबरोबर विलिनीकरण झाल्याचे डीबीएस बँक इंडियाने म्हटले आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलास मिळणार आहे.
आरबीआयने विशेष अधिकारांचा वापर करत लक्ष्मी विलास बँकेचे डीबीएस बँक इंडियाबरोबर २७ नोव्हेंबरला विलिनीकरण केले आहे. या विलिनीकरणानंतर आरबीआयने लक्ष्मी विलास बँकेवर लागू केलेले निर्बंध २७ नोव्हेंबरपासून रद्द झाले आहेत. पूर्वीप्रमाणे लक्ष्मी विलास बँकेतील सर्व शाखा, डिजीटल चॅनेल आणि एटीएम सेवा पूर्ववत झाल्या आहेत.
हेही वाचा-लक्ष्मी विलास बँकेच्या विलिनीकरणाची योजना; आरबीआय पुढील आठवड्यात करणार जाहीर
बचत खात्यावरील व्याजदर आणि ठेवीवरील व्याजदर हे पूर्वीप्रमाणे राहणार असल्याचे डीबीएस बँकेने म्हटले आहे. डीबीएस बँकेच्या अटीप्रमाणे लक्ष्मी विलास बँकेच्या कर्मचाऱ्यांची सेवा पूर्वीप्रमाणे सुरुच राहणार आहे. मूळची सिंगापूरची असलेली डीबीएस बँक ही येत्या महिन्यात लक्ष्मी विलास बँकेची सिस्टिम आणि नेटवर्कवर काम करणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर लक्ष्मी विलास बँकेच्या ग्राहकांना डीबीएसची सर्व उत्पादने आणि सेवा मिळणे शक्य होणार आहे.
हेही वाचा-लक्ष्मी विलास बँकेच्या शेअरला मोठा फटका; पाच दिवसांत ४८ टक्क्यांनी घसरण
एलव्हीबी बँकेवर १७ नोव्हेंबरला लादण्यात आले होते निर्बंध-
केंद्र सरकारकडून लक्ष्मी विलास बँकेवर अनेक प्रकारची बंधने घालण्यात आली आहेत. पुढील एका महिन्यासाठी ही बंधने असणार आहेत. आता या बँकेतून ग्राहकांना १६ डिसेंबरपर्यंत केवळ २५ हजार रुपयेच काढता येणार आहेत. गेल्या १ वर्षापासून ही बँक तो़ट्यात होती. बँक व्यवहारांमध्येदेखील अफरातफर झाल्याचा संशय आहे. म्हणून या बँकेवर बंधने घातण्यात आली आहेत. कॅनरा बँकेचे माजी कार्यकारी अध्यक्ष टी. एन. मनोहरन यांना या बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.