मुंबई - जेट एअरवेजच्या वैमानिकांनी १ एप्रिलपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. ३१ मार्चपर्यंत थकित पगार देण्याची मागणी वैमानिकांनी केली आहे. हा निर्णय वैमानिकांची संघटना असलेल्या नॅशनल एव्हिटर्स गिल्डच्या वार्षिक बैठकीत घेण्यात आला.
नॅशनल एव्हिटर्स गिल्डचे देशभरात १ हजार वैमानिक सदस्य आहेत. जर तोडगा काढण्यात आला नाही तर संपावर जाणार असल्याचे गिल्डने म्हटले आहे. वैमानिक आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांना डिसेंबरपासून संपूर्ण पगार मिळालेला नाही. तसेच व्यवस्थापनाकडून पगाराबाबत कोणतेही आश्वासन वैमानिकांना मिळाले नाही.
गेल्या आठवड्यात गिल्डने केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांना पत्र लिहून लक्ष घालण्याची मागणी केली होती. केंद्रीय हवाई मंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी तातडीने बैठक घेण्याचे सचिवांना आदेश दिले होते. हवाई वाहतूक संचालनालयाने मंगळवारी तातडीने बैठक घेत आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजबाबत काय करता येईल याबाबत चर्चा केली आहे. जेट एअरवेजबाबत सरकार काय उपाय करण्यात येणार आहे, याकडे वैमानिकांचे लक्ष लागलेले आहे.