सियाटल - अमेझॉन या बलाढ्य कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून पायउतार होण्याची घोषणा जेफ बेझोस यांनी केली आहे. जेफ बेझोस हे अॅमेझॉनचे संस्थापक असून २७ वर्षांपूर्वी त्यांनी या कंपनीची स्थापना केली होती. अँन्डी जस्सी यांची आता मुख्य कार्यकारी पदावर नियुक्ती होणार आहे. बेझोस आता अॅमेझॉनच्या कार्यकारी संचालक पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
तिसऱ्या तिमाहीत सोडणार पद -
२०२१ आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत जेफ बेझोस पदावरून निवृत्त होणार आहेत. अँन्डी जस्सी हे सध्या वेस सर्व्हिसेसचे प्रमुख आहेत. मात्र, त्यांना बढती मिळून ते मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतील. २०२० या आर्थिक वर्षाचा आर्थिक ताळेबंद जाहीर करताना बेझोस यांनी ही घोषणा केली. नाविण्यपूर्ण शोधांमुळे आज अॅमेझॉन इथपर्यंत पोहचली, असे बेझोस नव्या सीईओची घोषणा करताना म्हणाले.
अॅमेझॉन कंपनी कल्पक आणि नाविण्यपूर्ण शोधांवर पुढे गेली
तुम्ही योग्य पद्धतीने काम करत राहीला तर नाविण्य पूर्ण शोध लागतात. मात्र, काही काळाने लोक त्यालाही कंटाळतात. एका शोधकासाठी ही चांगली संधी असते काहीतरी नवीन पुन्हा तयार करण्याची. आमच्या कंपनीचा आर्थिक ताळेबंद पाहता, अनेक वर्षांपासून नाविण्यपूर्ण शोध लावत गेल्याचा हा परिपाक असल्याचे दिसून येते, असे जेफ बेझोस म्हणाले.