नवी दिल्ली- राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याच्या शक्यतेने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हुवाईच्या उत्पादनांवर बंदी घातली आहे. ही कंपनी भारतामध्ये ५ जी स्पेक्ट्रमची चाचणी घेण्यासाठी उत्सुक आहे. ट्रायचे चेअरमन आर. एस. शर्मा यांना हुवाईबाबत विचारले असता त्याबाबत केंद्र सरकारने निर्णय घ्यायचा आहे, असे ते म्हणाले.
हुवाईबाबात भारताची भूमिका घेणे हा मोठा प्रश्न असल्याचे दूरसंचार नियामक असलेल्या ट्रायचे चेअरमन आर.एस.शर्मा यांनी म्हटले आहे. त्यांनी हुवाईबाबत अधिक प्रतिक्रिया देणे टाळले. यंदा दूरसंचार विभाग ५ जीची चाचणी घेण्याची तयारी करत आहे. या चाचणीबाबत हुवाईच्या अधिकाऱ्यांनी गतवर्षी दूरसंचार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. तसेच ५ जी ची परवानगी मिळणार असल्याचा दावाही केला होता.
काय घडल्या आहेत हुवाई कंपनीबाबतच्या घडामोडी -
चीन-अमेरिकेतील व्यापारी युद्ध भडकले असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. यामुळे अमेरिकन कंपन्यांना विदेशातील दूरसंचार उत्पादने विकत घेताना अमेरिकन सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. याचा थेट फटका हुवाईच्या उत्पादनांना बसणार आहे. हुवाई ही चीनी कंपनी राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरेल, अशी भीती जगभरातील विविध देशांनी व्यक्त केली होती. मात्र हे आरोप हुवाईने फेटाळून लावले होते.
गुगलने हुवाईला अँड्राईडच्या अपडेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हुवाईच्या उत्पादनांच्या सेवाबाबत अनिश्चितता आहे. असे असले तरी हुवाईने स्मार्टफोन आणि टॅबलेटची विक्रीपश्चात सेवा आणि सुरक्षेचे अपडेट सुरुच राहतील, असे म्हटले आहे.