कोलकात्ता - आयटीसी ग्रुपचे चेअरमन वाय.सी.देवेश्वर यांचे आज दीर्घकाळ आजारानंतर निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. कंपनीचे सीईओ म्हणून सर्वात अधिक काळ काम करणाऱ्या व्यक्तीपैकी देवेश्वर हे एक होते. त्यांनी २० वर्षे आयटीसीची धुरा वाहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून देवेश्वर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देवेश्वर यांच्या निधनाचे वृत्त ट्विटरवर पोस्ट केले आहे.
ट्विटमध्ये त्यांनी म्हटले, वाय.सी.देवेश्वरजी यांच्या निधनानंतर दु:ख झाले आहे. ते कार्पोरेट जगतामधील मोठे व्यक्तिमत्व होते. उद्योगजगताचे कर्णधार असलेल्या देवेश्वर यांच्या अनेक आठवणी आहेत. त्यांच्या कुटुंबीय, सहकारी आणि प्रशंसक यांच्यासाठी शोकसंवेदना व्यक्त करते. देवेश्वर यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला पद्मभूषण पुरस्कार २०११ मध्ये मिळाला.
ते आयटीसीमध्ये १९६८ मध्ये रुजू झाले. आयटीसीची तंबाखू कंपनी ते एफएमसीजीमधील आघाडीची कंपनी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. देवेश्वर हे आयटीसी कंपनीचे १९९६ मध्ये कार्यकारी चेअरमन झाले. त्यांच्या कार्यकाळात ५ हजार २०० कोटीहून कंपनीची ५१ हजार ५०० कोटीवर उलाढाल पोहोचली आहे.
एअर इंडियाचे चेअरमन म्हणूनही पाहिले होते काम-
देवेश्वर यांचा लाहोरमध्ये ४ फेब्रुवारी १९४७ मध्ये जन्म झाला होता. त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) दिल्लीमधून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर हॉर्वड विद्यापीठातून देवेश्वर यांनी व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले. सरकारी मालकीच्या एअर इंडियाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी १९९१ ते १९९४ दरम्यान काम पाहिले. तसेच त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मंडळावर संचालक म्हणूनही काम केले आहे. त्यांनी २०१७ मध्ये आयटीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद सोडले होते. त्यानंतर अकार्यकारी अधिकारी चेअरमन म्हणून ते कार्यरत होते.