नवी दिल्ली - दक्षिण कोरियाच्या हुंदाई कंपनीने पूर्ण इलेक्ट्रीक असलेल्या एसयूव्ही कॉना कारचे आज लॉंचिंग करण्यात आले. ही कार एकाच चार्जिंगमध्ये ४५२ किमी धावते, असा दावा कंपनीने केला आहे. या मॉडेलची देशात २५.३ लाख रुपये एवढी किंमत आहे. वैयक्तिक वापरासाठी असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारने मदत करावी, अशी हुंदाईचे सीईओ एस.एस.किम यांनी अपेक्षा केली.
हुंदाई मोटर इंडिया लि. (एचएमआयएल) ही देशात इलेक्ट्रिक बाजारपेठ विकसित होण्यासाठी नियोजन करत आहे. त्याचाच भाग म्हणून आज एसयूव्ही कॉना या कारचा शुभांरभ केला आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर सवलत देण्याचा सकारात्मक निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला. मात्र इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारने आणखी प्रयत्न करावेत, असे एचएमआयएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ एस.एस.किम यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले, सध्या इलेक्ट्रिक वाहने ही खूप महागडी आहेत. या वाहनांचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने परवडणाऱ्या दरात मिळणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिक वाहनांना फेम -२ योजनेतून जास्त सवलत दिली तर भारतीय बाजारपेठेसाठी ही बाब 'गेम चेंजर' ठरणार आहे.
भारताच्या भविष्यातील मोबिलिटी प्रवासाचा एसयूव्ही कोना हा क्रांतीकारी टप्पा ठरणार आहे. इलेक्ट्रिक कारचा पुढील टप्पा निश्चित करणार असल्याचे किम यांनी म्हटले आहे. हुंदाईचे जगभरात पर्यावरणस्नेही ४४ मॉडेल आहेत. यामध्ये समावेश असलेल्या संपूर्ण इलेक्ट्रिक असलेल्या २३ कार २०२५ पर्यंत बाजारात येणार आहेत.
कारमधील सुविधा-
कारची संपूर्ण चार्जिंग ६ तासात होवू शकते. कारमध्ये सहा एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम्स आणि टाय प्रेशर मॉनिरटिंग सिस्टिम आणि मार्गदर्शक सूचनांसह रिअर कॅमेराची सुविधा आहे.
भारतीय बाजारपेठ विकसित होण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागतील -
सध्या हैदराबाद आणि दक्षिण कोरियामधील संशोधन आणि विकास गट हा इलेक्ट्रिक वाहनाबाबत काम करत आहे. भारतीय बाजारपेठ मोठ्या प्रमाणात विकसित करण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागतील, असे ते म्हणाले.
देशातील ११ शहरांमध्ये मिळणार कॉना एसयूव्ही -
कॉना ईव्ही ही चेन्नमधील उत्पादन प्रकल्पात असेम्बेल करण्यात आली आहे. यामधील वाहनांचे बहुतांश भाग आयात करण्यात आले आहेत. चार्जिंगची सुविधा आणि मागणीची अपेक्षा लक्षात घेवून कॉना ईव्ही ही देशातील ११ शहरात उपलब्ध होणार आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीत स्पर्धा सुरू होण्याची शक्यता-
केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण जाहीर केले आहे. तसेच नीती आयोगानेही इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी उत्पादन कंपन्यांना सूचना केल्या आहेत. अशा स्थितीत हुंदाईने इलेक्ट्रिक कारचा शुभारंभ आहे. त्यामुळे वाहन उद्योगात इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीत स्पर्धा सुरू होण्याची शक्यता आहे.