नवी दिल्ली - सर्वच वस्तू ऑनलाईन मिळत असताना दुचाकीही मिळणार आहे. देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्मिती करणाऱ्या हिरो मोटोकॉर्प कंपनीने विक्री वाढविण्यासाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना घरपोच बाईक व स्कूटर दिली जाणार आहे.
हिरो मोटोकॉर्पने यापूर्वीच घरपोहोच दुचाकी देण्याच्या सेवेची मुंबई, बंगळुरु आणि नोएडामध्ये सुरुवात केली आहे. या सेवेचा येत्या काही महिन्यांत २५ शहरामध्ये विस्तार करण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना हिरो मोटोकॉर्पच्या विक्री विभागाचे प्रमुख संजय भान म्हणाले, ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रक्रिया आणि व्यावसायिक प्रारुपांवर (मॉडेल) गुंतवणूक करत आहोत. नव्या उपक्रमामुळे दुचाकी प्रकारामध्ये ग्राहकांना वेगळ्या सेवेचा अनुभव घेता येणार आहे. आजची तरुणाई मूल्यवर्धित सेवांवर लक्ष देत आहे. त्यामुळे ब्रँड असलेल्या कंपन्यांना वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेतील वातावरणाप्रमाणे बदलावे लागत असल्याचेही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, आम्ही ई-कॉमर्समध्ये प्रथम पोहोचलो आहोत. नव्या सेवेतही हा ट्रेण्ड सुरू ठेवणार आहोत. दुचाकी अथवा स्कूटर ही ग्राहकाच्या इच्छेनुसार कोणत्याही पत्त्यावर पोहोचवता येणार आहे.
एवढा येणार खर्च-
देशात विक्री होणाऱ्या प्रत्येक दोन दुचाकीपैकी एक दुचाकी हिरो मोटोकॉर्पची असते. कंपनीने दुचाकी खरेदी करण्यासाठी पोर्टल सुरू केले आहे. ग्राहकांना घरपोच दुचाकी मिळविण्यासाठी ३४९ रुपये खर्च येणार आहे.