नवी दिल्ली - आगामी सणानिमित्त खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी खूशखबर आहे. वॉलमार्टच्या मालकी असलेल्या फ्लिपकार्टने वार्षिक 'बिग बिलियन डे'ची घोषणा केली आहे. ग्राहकांना १६ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरदरम्यान सवलतीच्या दरात खरेदी करता येणार आहे.
बिग बिलियन डे हा सहा दिवसांचा खरेदी महोत्सव असणार आहे. यामध्ये ग्राहकांना नवीन उत्पादने, एमएसएमई आणि इतर उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्टची स्पर्धक कंपनी अॅमेझॉनही पुढील आठवड्यात सेल जाहीर करणार आहे. तर स्नॅपडीलही ऑक्टोबरमध्ये नवरात्रीच्या काळात सेल जाहीर करणार आहे.
आगामी सणानिमित्त ई-कॉमर्स कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात विक्रीवर सवलतीच्या घोषणा करण्यात येणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि होम फर्निशिंगच्या खरेदीला ग्राहकांकडून मोठी मागणी असणार आहे. रेडसीरच्या अंदाजानुसार यंदा गतवर्षीच्या तुलनेत विक्रीचे प्रमाण दुप्पट होऊन ७ अब्ज डॉलर होणार आहे. बजाज फिन्सर्वकडून ईएमआयवर कारसह डेबिट कार्डवर खरेदीचे अनेक पर्याय ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. फ्लिपकार्टने म्हटले, की यंदा हंगामी ७० हजार प्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होणार आहेत. तर अप्रत्यक्ष १ लाख हंगामी नोकऱ्या निर्माण होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.