नवी दिल्ली - वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिपकार्टला वर्ष २०१८-१९ मध्ये ३ हजार ८३६.८ कोटींचा तोटा झाला आहे. ही माहिती फ्लिपकार्टने कंपनी व्यवहार मंत्रालयाला दिली आहे.
फ्लिपकार्टला ३१ मार्च २०१८ पर्यंत २ हजार ६३.८ कोटींचा तोटा झाला होता. पेपर व्हीसी या संस्थेच्या माहितीनुसार फ्लिपकार्टच्या तोट्यात ८५.९१ टक्के वाढ झाली आहे. असे असले तरी कंपनीच्या महसुलात वर्ष २०१८-१९ मध्ये ४२.८२ टक्के वाढ झाली आहे. वर्ष २०१८-१९ मध्ये ३० हजार ९३१ कोटी महसूल गोळा झाला, तर वर्ष २०१७-१८ मध्ये २१ हजार ६५७.७ कोटींचा महसूल गोळा झाला होता.
हेही वाचा-टाटा मोटर्सचे शेअर १७ टक्क्यांनी वधारले; भांडवली मुल्यात ७ हजार १०३ कोटींची वाढ
फ्लिपकार्टची अॅमेझॉनबरोबर ऑनलाई शॉपिंगच्या व्यवसायात तगडी स्पर्धा आहे. फिल्पकार्ट इंडिया ही मोबाईलसह विविध उत्पादनांचे घाऊक वितरण करते. यामध्ये टेलिव्हिजन, लॅपटॉप, टॅबलेट, मोबाईल अॅक्सेसरी, पादत्राणे व कपडे अशा उत्पादनांचा समावेश आहे. अमेरिकेची रिटेलमधील बलाढ्य कंपनी असलेल्या वॉलमार्टने गतवर्षी ऑगस्टमध्ये फ्लिपकार्टमधील ७७ टक्के हिस्सा घेतला आहे. त्या बदल्यात वॉलमार्टने सॉफ्ट बँकसारख्या गुंतवणूकदारांना चांगला परतावाही दिला आहे.