बंगळुरू - रोजगाराच्या संधी कमी असताना फ्लिपकार्टने विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. फ्लिपकार्ट वेतनासह प्रशिक्षणार्थी (पेड इंटर्नशिप) होण्याची विद्यार्थ्यांना संधी देणार आहे. त्यासाठी फ्लिपकार्टने श्रेणी-३ शहरांमधील पदवीधर नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी लाँचपॅड प्रोग्रॅम सुरू केला आहे.
फ्लिपकार्टच्या लाँचपॅड प्रोग्रॅमध्ये विद्यार्थ्यांना ४५ दिवसांची इंटर्नशिप करता येणार आहे. या प्रशिक्षणाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना पुरवठा साखळीचे व्यवस्थापन आणि ई-कॉमर्समध्ये व्यावसायिक होण्याचे प्रशिक्षण मिळणार आहे. गतवर्षी फ्लिपकार्टच्या इंटर्नशिप प्रोग्रॅममध्ये २ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
देशातील २१ शहरांमध्ये असलेल्या शैक्षणिक संस्थांमधून गुणवत्ताधारक विद्यार्थी निवडण्यासाठी काम सुरू असल्याचे फ्लिपकार्टने म्हटले आहे. यामध्ये भिवंडीमधील शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. कोरोनाच्या काळात आरोग्यासाठी काळजी घेऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना काम दिले जाणार असल्याचे फ्लिपकार्टने म्हटले आहे.
दरम्यान, आगामी सणानिमित्त ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन फ्लिपकार्टने हजारो हंगामी नोकरीच्या संधी दिल्या आहेत.