नवी दिल्ली - सलग तीन महिन्यांच्या घसरणीनंतर नोव्हेंबरमध्ये औद्योगिक उत्पन्नात वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये औद्योगिक उत्पन्नात १.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. उत्पादन क्षेत्रातील वृद्धीदराने औद्योगिक उत्पादनात वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे.
नोव्हेंबर २०१८ मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या (आयआयपी) वृद्धीदरात ०.२ टक्क्यांची नोंद होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार (एनएसओ) नोव्हेंबरमध्ये उत्पादन क्षेत्राचा वृद्धीदर हा २.७ टक्के राहिला आहे. तर गतवर्षी नोव्हेंबरमध्ये उत्पादन हे घसरून ०.७ टक्के एवढे राहिले होते. तर नोव्हेंबर २०१८ मध्ये वीजनिर्मितीत ५ टक्क्यांची घसरण झाली. तर गतवर्षी नोव्हेंबरमध्ये ५.१ टक्के वीजनिर्मितीचा वृद्धीदर राहिला होता.
हेही वाचा-अॅमेझॉनचा १९ जानेवारीपासून सुरू होणार 'ग्रेट इंडियन सेल'
चालू वर्षाच्या नोव्हेंबरमध्ये खाणकामाचे उत्पादन हे घसरून १.७ टक्के राहिले आहे. गतवर्षीच्या नोव्हेंबरमध्ये खाणकामाचे उत्पादन हे २.७ टक्के राहिले होते. चालू वर्षात एप्रिल-नोव्हेंबरदरम्यान औद्योगिक उत्पादन निर्देशांक हा ०.६ टक्के होता. तर गतवर्षी एप्रिल-नोव्हेंबरदरम्यान औद्योगिक उत्पादन निर्देशांक हा ५ टक्के राहिला होता.