नवी दिल्ली - मारुती सुझुकीच्या मनेसर कारखान्यातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. असे असले तरी कारखान्यातील काम सुरळित सुरू असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कोरोनाच्या संकटाने सुरू असलेल्या टाळेबंदीनंतर गेली ५० दिवस मारुती सुझुकीचा कारखाना बंद होता. त्यानंतर मारुती सुझुकी इंडियाने मनेसरमधील कारखाना चालू महिन्यात पुन्हा सुरू केला आहे.
कोरोनाबाधित कर्मचारी हा कंटेनमेंट क्षेत्रातील रहिवासी आहे, असे मारुतीच्या प्रवक्त्याने सांगितले. कोरोनाबाधित कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला दिल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.
हेही वाचा-कोरोनाच्या संकटाने छोट्या शहरांत 'ही' निर्माण होणार नवी संधी
सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोनाबाधित कर्मचाऱ्याला मदत केली जात असल्याचे मारुती सुझुकीने म्हटले आहे. दरम्यान, मनेसर आणि गुरुग्राममधील कारखान्यामधून दरवर्षी मारुती सुझुकीच्या १५.५ लाख वाहनांचे उत्पादन घेण्याची क्षमता आहे.
हेही वाचा-कोरोनाचा परिणाम; नोकरीच्या शोधात असलेले म्हणतात.. घरूनच काम हवे!