नवी दिल्ली - सामाजिक उत्तरदायित्वाची जबाबदारी (सीएसआर) ही कायद्याने बंधनकारक असू नये. त्यासाठी समाजाकरता उत्स्फूर्तपणे योगदान व्हावे, असे मत विप्रोचे संस्थापक आणि दानशूर अझीम प्रेमजी यांनी व्यक्त केले. ते ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या (एआयएमए) कार्यक्रमात बोलत होते.
विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी म्हणाले की, कोरोनाच्या संकटात जागे होण्याची वेळ आहे. आरोग्यासारख्या सार्वजनिक व्यवस्था, समाजाची रचना समान करणे असे मूलभूत प्रश्न आहेत. मला वाटत नाही, सीएसआर हे कायद्याने बंधनकारक असू नये. समाजकार्य अथवा दान हे मनापासून व्हावे. ते बंधनकारक होणे शक्य नाही. मात्र, हे माझे वैयक्तिक मत आहे. हा कायदा आहे. त्याचे सर्व कंपन्यांनी पालन करणे गरजेचे आहे. वैयक्तिक दानशूरपणा आणि कंपन्यांचे सीएसआरचे प्रयत्न हे भिन्न असल्याचेही प्रेमजी म्हणाले.
हेही वाचा- सिमेंटच्या मागणीमध्ये वाढ, किमती स्थिर -मोतीलाल ओसवाल अहवाल
जेव्हा मी टीम आणि भागीदारांशी बोलतो तेव्हा त्यांच्या बोलण्यातून देशात सुधारणा करण्याचे ध्येय दिसते. हे सर्वात मोठे समाधान आहे. एआयएमएने अझीम प्रेमजी यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अॅवार्ड पुरस्कार कार्यक्रमात दिला आहे. दरम्यान, गतवर्षी अझीम प्रेमजी यांनी ७,९०४ कोटी रुपये दान केले आहे.