मुंबई - दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडिया बाजारात तग धरू शकणार का, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. एजीआरचे थकित शुल्क भरावे लागणार असल्याने व्होडाफोन आयडिया संकटात आहे. अशा स्थितीत तीन संस्थांनी दोनच दिवसात व्होडाफोन आयडियाचे पतमानांकन कमी केले आहे.
इंडिया रेटिंग्ज, ब्रिकवर्ग रेटिंग्ज, क्रिसिल या पतमानांकन संस्थांनी व्होडाफोन आयडियाचे मानांकन कमी केले आहे. असे असले तरी व्होडाफोन आयडियाचे शेअर दुपारी ४ टक्क्यांनी वधारून प्रति शेअर ४.३६ रुपये झाले आहेत.
हेही वाचा-'जीएसटी हा २१ व्या शतकातील सर्वात मोठा वेडेपणा'
दूरसंचार विभागाचे एजीआरचे शुल्क थकल्याने सरकारकडून बँक हमीची रक्कम जप्त होवू शकते. व्होडाफोन आयडियाचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांनी बुधवारी दूरसंचार विभागाचे सचिव अंशु प्रकाश यांची भेट घेतली. व्होडाफोन आयडियाने दूरसंचार विभागाला एजीआर शुल्कापोटी २,५०० कोटी रुपये दिले आहेत.
हेही वाचा-मंदावलेल्या आर्थिक स्थितीचा आणि कोरोनाचा 'या' सरकारी कंपनीवर परिणाम नाही
एजीआर शुल्क प्रकरणात सरकारने दिलासा द्यावा, अशी कुमार मंगलम बिर्ला यांनी यापूर्वी मागणी केली होती. एजीआर शुल्कात दिलासा मिळाला नाही तर व्यवसाय करणे अवघड होईल, असे बिर्ला यांनी म्हटले होते. बँक हमीची रक्कम जप्त करू नये, अशी व्होडाफोन आयडियाने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली होती.