नवी दिल्ली - कोरोनाच्या लढ्यात देशाला आणखी बळ मिळणार आहे. कारण, कोवोव्हॅक्स या कोरोनाच्या लशीची भारतात चाचणी सुरू झाली आहे. ही माहिती सीरम इन्स्टीट्युट ऑफ इंडियाचे (एसआयआय) सीईओ आदार पुनावाला यांनी दिली आहे.
आदार पुनावाला यांनी ट्विट करत कोवोव्हॅक्स लशीच्या चाचणीची माहिती दिली आहे. या लशीची आफ्रिकन आणि आशियन प्रकारच्या कोरोना विषाणुवर चाचणी करण्यात आली आहे. ही लस ८९ टक्के कार्यक्षम आढळून आल्याचे पुनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ही लस यावर्षी सप्टेंबरमध्ये लाँच होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहन परवान्याच्या वैधतेला जूनपर्यंत वाढ
अमेरिकेची लस कंपनी नोवॅवॅक्स कंपनीने सीरमबरोबर एनव्हीएक-कोव्ह२३७३ या कोरोना लशीच्या व्यावसायिक उत्पादनासाठी ऑगस्ट २०२० मध्ये करार केला आहे. ही लस कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या भारतासह इतर देशांमध्ये वापरण्याचे कंपनीचे नियोजन आहे.
हेही वाचा-सायरस मिस्त्रींबरोबरील वादात 'सर्वोच्च' विजय; रतन टाटांनी ही' दिली प्रतिक्रिया
केंद्र सरकारने आपत्कालीन स्थितीत ऑक्सफोर्डने व बायोटेकने विकसित केलेल्या लशीला परवानगी दिली आहे. देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमात या दोन लशींचा वापर केला जात आहे. कोरोनाचा देशात वेगाने संसर्ग वाढत आहे. मात्र, तरुणांना अद्याप कोरोना लस देण्यात येत नाही.
महाराष्ट्र राज्यात सोमवारपासून रात्रीच्यावेळी जमावबंदी लागू-
जनतेनेही कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आपण बेडस, आरोग्य सुविधा वाढवू. परंतु, डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार हे लक्षात घेतले पाहिजे. खासगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात तसेच कार्यालयीन वेळेसंदर्भात बदल करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सुचनांचे आदेश निर्गमित केले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत आहे. संपूर्ण राज्यात रविवारी (दिनांक 28 मार्च) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.