नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नोकरी कपातीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. उबेर इंडियाने पूर्णवेळ काम करणाऱ्या ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याचे जाहीर केले आहे.
मनुष्यबळातील कपातीत वाहन चालक आणि रायडर सपोर्टर यांचा समावेश असल्याचे उबेर इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष प्रदीप परमेश्वरन यांनी सांगितले. कोरोनाचा परिणाम झाला असताना परिस्थिती कशी सुधारणा होईल, हे सांगणे अशक्य आहे. त्यामुळे उबेर इंडियापुढे मनुष्यबळात कपात करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचे परमेश्वरन यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-भारत फोर्जचे मुंढवासह चाकणमधील उत्पादन प्रकल्प होणार सुरू
सहकारी हे उबेर कुटुंबामधून सोडून जात असल्याने आजचा दिवस अत्यंत वाईट आहे. भविष्याकडे आत्मविश्वासाने पाहता यावे, यासाठी हा निर्णय घेतल्याचे उबेर इंडियाच्या अध्यक्षांनी म्हटले. कंपनी सोडून जाणाऱ्यांची त्यांनी माफी मागितली आहे. तसेच उबेरसाठी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभारही मानले आहेत. यापूर्वीही परमेश्वरन यांनी मनुष्यबळात कपात करणार असल्याचे जाहीर केले होते.
हेही वाचा-...म्हणून एन-९५ मास्क देशात ४७ टक्क्यांनी झाले स्वस्त
दरम्यान, यापूर्वी ओलास, झोमॅटो, स्विग्गी अशा अनेक ऑनलाईन कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.