बंगळुरू - इन्फोसिसचे चेअरमन नंदन निलकेणी यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक लढविणे ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, असे म्हटले आहे. क्रिकेट, बॉलिवूड आणि राजकारणामध्ये स्वारस्य नसल्याचे त्यांनी सांगितले. ते एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
नंदन निलकेणी म्हणाले, निवडणुकीसाठी उभा राहणे ही मोठी चूक होती, हे आयुष्यात शिकलो आहे. नंदन निलकेणी हे यूआयडीएआय या संस्थेच्या चेअरमनपदाचा राजीनामा देवून मार्च २०१४ मध्ये काँग्रेसमध्ये सामिल झाले होते. त्यांनी दक्षिण बंगळुरू या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत भाजपचे नेते अनंत कुमार यांनी निलकेणी यांचा ३.२ लाख मतांनी पराभव केला होता.
निलकेणी हे काँग्रेसचे सदस्य आहेत. मात्र ते राजकारणात सक्रिय राहिलेले नाहीत. त्यावेळी निवडणुकीमध्ये देशातील सर्वोत श्रीमंत उमेदवारांपैकी निलकेणी हे होते. त्यांची मालमत्ता सुमारे ७ हजार ७०० कोटींची असल्याची त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या नामनिर्देशनपत्रात माहिती दिली होती.
तंत्रज्ञानाच्यादृष्टीने मी निरक्षरच- नंदन निलकेणी
त्यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अॅपचा वापर करण्याऐवजी वाचन आणि लेखनाला महत्त्व देत असल्याचे सांगितले. तंत्रज्ञानाचा वापर करताना खरेतर मी तंत्रज्ञानाच्यादृष्टीने निरक्षर आहे. अॅपचा वापर करण्याऐवजी वाचन आणि विचा करा, असे ते म्हणाले. अॅपवर काम केल्याने उत्पादकता कमी होते, असेही निलकेणी म्हणाले.
यावेळी त्यांनी आंत्रेप्रेन्युअर म्हणून मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांचे कौतुक केले. ते म्हणाले, नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टसाठी चकित करणारे काम केले आहे. मायक्रोसॉफ्टची भांडवली मूल्य आहे १ लाख कोटी डॉलर आहे. मोबाईलच्या युगात कंपनी चांगली काम करत नव्हती. मात्र क्लाऊड तंत्रज्ञानामध्ये गेल्याने चांगले काम करत आहे. तो प्रभावी आणि खूप वैचारिक नेता (लीडर) आहे, अशा शब्दात निलकेणी यांना नाडेलांचे कौतुक केले आहे.