नवी दिल्ली - एकाच विदेशी ब्रँडकडून किरकोळ क्षेत्रासह डिजीटल मीडियात १०० गुंतवणूक करता येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने नियम शिथील केले आहेत. तर उत्पादनासह कोळशाच्या खाणीत स्वयंचलित मार्गाने (ऑटोमेटेड रुट) विदेशी कंपन्यांना१०० टक्के थेट गुंतवणूक करता येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. यामध्ये घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी दिली. कोळशाच्या खाणकामासह उत्पादन क्षेत्रातील १०० टक्के विदेशी गुंतवणुकीला मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले. हा निर्णय देशातील उत्पादनाला चालना देण्यासाठी घेण्यात आल्याचे गोयल यांनी सांगितले.
किरकोळ क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या विदेशी कंपनीला देशातील कंपनीबरोबर भागीदारी करणे बंधननकारक होते. यामध्ये बदल करून एकट्या कंपनीला ( सिंगल ब्रँड ) ऑनलाईन विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन विक्री करणाऱ्या विदेशी कंपनीला देशात स्टोअर असण्याची अटही काढून टाकण्यात आली आहे.