नवी दिल्ली – टिकटॉकची मालकी असलेली बाईटडान्स कंपनी देशातील टिकटॉकचा हिस्सा रिलायन्स जिओला विकणार असल्याची चर्चा आहे. टिकटॉकवर भारतात बंदी आल्यानंतर टिकटॉकवर 45 दिवसानंतर बंदी घालण्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच इशारा दिला आहे. अशा स्थितीत अनिश्चितता संपविण्यासाठी बाईटडान्स कंपनीकडून प्रयत्न सुरू आहेत.
टिकटॉकचा हिस्सा विकण्याबाबत बाईटडान्स आणि रिलायन्स जिओमध्ये प्राथमिक टप्प्यावर चर्चा असल्याचे एका माध्यमात म्हटले आहे. गेल्या महिन्यांपासून दोन कंपन्यांत चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप सौदा पूर्ण झाला नसल्याचे वृत्तात म्हटले आहे.
बाईटडान्समध्ये देशात सुमारे 2 हजार कर्मचारी कार्यरत
टिकटॉकचा देशातील व्यवसाय हा 3 अब्ज डॉलरहून अधिक आहे. दोन्ही कंपन्यांकडून सौद्याबाबत प्रतिक्रिया मिळाली नाही. टिकटॉकसह बाईटडान्समध्ये काम करणारे देशातील अनेक कर्मचारी हे दुसऱ्या कंपनीमध्ये नोकऱ्या शोधत आहेत. देशामध्ये बाईटडान्सच्या अॅपवर बंदी आल्याने त्यांना भविष्याबाबत चिंता वाटू लागली आहे. बाईटडान्समध्ये देशात सुमारे 2 हजार कर्मचारी आहेत.
कंपनीच्या सीईओ मेयर यांनी कर्मचाऱ्यांना दिले होते आश्वासन
दरम्यान, केंद्र सरकारने देशाच्या संरक्षणाच्या मुद्द्यावरून टिकटॉकसह 58 चिनी अॅपवर बंदी लागू केली आहे. त्यानंतर टिकटॉकचे सीईओ केवीन मेयर यांनी कर्मचारी ही कंपनीची मोठी ताकद असल्याच म्हटले होते. त्यांची संधी आणि सकारात्मक अनुभव पूर्ववत करण्यासाठी सर्व ताकदपणाला लावू, असे मेयर यांनी ब्लॉगमध्ये म्हटले होते.
अमेरिकेतील टिकटॉकचा हिस्सा विकत घेण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि ट्विटर कंपनी उत्सुक आहेत. मात्र, अजूनही सौद्याची प्रक्रिया निश्चित टप्प्यावर पोहोचली नाही.