नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या मालकीची कंपनी बीएसएनएल सध्या आर्थिक संकटात आहे. पैसे थकविणाऱ्या रिलायन्स कम्यनुकेशनविरोधात एनसीएलटीमध्ये या आठवड्यात दाद मागण्याचा निर्णय बीएसएनएलने घेतला आहे. रिलायन्सने बीएसएनएलचे ७०० कोटी रुपये थकविले आहेत.
कर्जबाजारी रिलायन्सने राष्ट्रीय कंपनी अपील लवादाकडे नादारी प्रक्रियेबाबत मागणी केली होती. यातून कंपनीला वेळेत मालमत्ता विकता येईल, असे रिलायन्सने म्हटले होते. बीएसएनएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी रिलायन्सकडून ७०० कोटी रुपये वसूल करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
विविध सर्कल ऑफिसमधून बिले मिळण्यास उशीर झाल्याने हा दावा दाखल करण्यास बीएसएनएलला वेळ लागला आहे. सर्वोच्च न्यायलयाने रिलायन्स कम्युनिकेशन ग्रुपला एरिकसनचे थकित पैसे देण्याचे आदेश १९ मार्चला दिले होते. अन्यथा रिलायन्सचे चेअरमन अनिल अंबानी यांना तीन महिने तुरुंगवास होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले होते. कर्मचाऱ्यांच्या पगार थकविल्याने बीएसएनएलवर आर्थिक संकट असल्याचे समोर आले आहे.