न्यूयॉर्क - बोईंग या विमान निर्मिती करणाऱ्या कंपनीने १२ हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. कोरोना महामारीमुळे उद्योगावर परिणाम झाल्याने कंपनीने कर्मचारी कपात केली आहे.
बोईंग अमेरिकेतील ६ हजार ७७० कर्मचाऱ्यांना कामावरून घरी बसविणार आहे. तर आणखी ५ हजार ५२० कर्मचाऱ्यांना बोईंग स्वेच्छानिवृत्ती देणार आहे. बोईंगने एकूण मनुष्यबळात १० टक्के कपातीची घोषणा केली आहे. त्यामुळे एकूण १ लाख ६० हजार कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. येत्या काही महिन्यात हजारो जणांना कामावरून काढण्यात येणार असल्याचे बोईंगच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
हेही वाचा-कोरोनाची चाचणी केवळ २०० रुपयात; सीएसआयआरचा रिलायन्सबरोबर करार
बोईंगचे संरक्षण आणि अंतराळ विभागाचे काम स्थिरपणे चालू आहे. त्यामुळे विमान वाहतुकीच्या व्यवसायातून होणारी हानी कमी होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जागतिक महामारीमुळे ९० टक्के विमान वाहतुकीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे विमान वाहतूक कंपन्यांनी नवीन विमान खरेदी थांबविली आहे. पूर्वीच्या विमान खरेदीच्या ऑर्डरही कंपन्यांनी रद्द केल्या आहेत. त्याचा बोईंग कंपनीला मोठा फटका बसला आहे.
हेही वाचा-टाळेबंदीच्या संकटातही व्यवसाय संधी; मास्क विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल