नवी दिल्ली - वाहनांचे सुट्टे भाग तयार करणारे क्षेत्र हे चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत अत्यंत वाईट स्थितीमधून गेले आहे. या क्षेत्रामधील सुमारे १ लाख हंगामी कर्मचाऱ्यांनी जुलैपर्यंत नोकऱ्या गमविल्याचे एसीएमए संघटनेचे अध्यक्ष दीपक जैन यांनी सांगितले.
एसीएमए (ऑटोमोटिव्ह कंपोनट मॅन्युफॅक्च्युअर्स असोसिएशन) ही वाहनांचे सुट्टे भाग तयार करणाऱ्या उद्योगांची संघटना आहे. वाहनांच्या सुट्टे भाग तयार करणाऱ्या उद्योगांची उलाढाल १.७९ लाख कोटी रुपयांनी कमी झाल्याची माहिती दीपक जैन यांनी दिली. पुढे ते म्हणाले, मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे २ अब्ज डॉलर गुंतवणुकीचे नुकसान झाले आहे. वाहन उद्योग दीर्घकाळापासून मंदावलेल्या स्थितीमधून जात आहे. सर्व प्रकारच्या श्रेणीतील वाहनांच्या विक्रीत घसरण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - बोगस कागदपत्रांचा 'असा'ही वापर; भामट्यांनी सरकारला लावला १० हजार कोटींचा चूना
वाहनांचे सुट्टे भाग तयार करणारे उद्योग हे वाहन उद्योगाच्या सहकार्याने चालतात. देशातील वाहन उत्पादनात सुमारे १५ ते २० टक्के घसरण झाली आहे. त्याचा वाहनांचे सुट्टे भाग तयार करणाऱ्या उद्योगांवर मोठा परिणाम झाला आहे.
हेही वाचा - 'सरकारने दिलासा दिला नाही तर व्होडाफोन-आयडिया होईल बंद'