चेन्नई - वाहन उद्योगावर मंदीचे सावट अजूनही कायम असल्याचे चित्र समोर येत आहे. हिंदूजा ग्रुपच्या मालकीच्या अशोक लिलँडने डिसेंबरमध्ये काही उत्पादन प्रकल्प बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठ्याचे संतुलन साधण्यासाठी हा निर्णय कंपनीने घेतला आहे.
काही उत्पादन प्रकल्पांचे काम २ ते १२ दिवस डिसेंबर २०१९ दरम्यान बंद ठेवण्यात येणार असल्याचे अशोक लिलँड कंपनीने शेअर बाजाराला कळविले आहे. वाहन उद्योगात मंदीची स्थिती असताना गेली काही महिने अशोक लिलँडकडून वाहनांचे उत्पादन कमी घेण्यात येत आहेत. त्यासाठी कंपनीने यापूर्वीही काही उत्पादन प्रकल्प बंद ठेवले होते. तसेच मारुती सुझुकी इंडिया, हिरो मोटोकॉर्प, टीव्हीएस ग्रुपची सुंदरम क्लेटोन या कंपन्यांनी काही दिवस आपले उत्पादन प्रकल्प बंद ठेवले होते.
हेही वाचा-इंटरनेट डाटाचे किमान दर ठरवा; दूरसंचार कंपन्यांची ट्रायला विनंती
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चुअर्सच्या आकडेवारीनुसार व्यावसायिक वाहनांची विक्री गतवर्षीच्या तुलनेत एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान २२.९५ टक्क्यांनी घसरली. अशोक लिलँडच्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत नोव्हेंबरमध्ये २२ टक्क्यांची घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजारात अशोक लिलँडच्या प्रति शेअरची किंमत ०.१९ टक्क्यांनी घसरून ७७.५० रुपये झाली आहे.
हेही वाचा-केंद्रीय मंत्रिमंडळाकडून वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयकाला मंजुरी