अहमदाबाद - गेल्या काही दिवसांपासून 'अमूल गोल्ड' दुधाचा अप्रचार करणारा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यामध्ये अमूलच्या दुधात भेसळ होत असल्याचा दावा करण्यात आला होता. याप्रकरणी 'गुजरात को ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन'ने (जीसीएमएमफ) गुजरातमध्ये पोलिसात तक्रार दिली आहे.
जीसीएमएमएफचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोधी म्हणाले, प्रयागराज येथील रहिवासी आशुतोष शुक्ला याने सोशल मीडियावर अमूलची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. हे खूप आक्षेपार्ह आहे. अमूलच्या अधिकाऱ्यांनी १६ डिसेंबरला शुक्लाशी संपर्क साधून सोशल मीडियावरील व्हिडिओ काढून टाकण्याची विनंती केली. मात्र, त्याने अमूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्याचा आग्रह केला.
हेही वाचा-खूशखबर! रुपेसह यूपीआयचा वापर केल्यास 'हे' लागणार नाही शुल्क
अमूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी १८ डिसेंबरला शुक्लाशी संपर्क केला असता त्याने १० लाख रुपये मागितले. त्यानंतर आक्षेपार्ह व्हिडिओ काढून टाकू, असे त्याने अधिकाऱ्यांना सांगितले. या प्रकारानंतर अमूलच्या अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी शुक्लाविरोधात खंडणी आणि अब्रुनुकसान केल्याचा गुन्हा नोंदविला आहे.
हेही वाचा-नव्या वर्षात कांद्यासह बटाट्याच्या किमती कमी होण्याची शक्यता