नवी दिल्ली -अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस हे पुढील आठवड्यात भारताच्या भेटीवर येणार आहेत. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतील, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
अॅमेझॉनची भारताच्या बाजारपेठेत लक्षणीय प्रगती होत आहे. दुसरीकडे देशातील व्यापाऱ्यांकडून अॅमेझॉनसह ई-कॉमर्स कंपन्यांचा निषेध करण्यात येत आहे. या कंपन्या ग्राहकांना मोठ्या सवलती देऊन बाजारपेठेतील वस्तूंचे दर प्रभावित करत असल्याचा व्यापारी संघटनांचा आरोप आहे. अशा स्थितीत जेफ बेझोस हे भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत.
हेही वाचा-शेअर बाजाराने नोंदविला विक्रमी निर्देशांक; खनिज तेलाचे दर घसरल्याचा परिणाम
गतवर्षी केंद्र सरकारने थेट विदेशी गुंतवणूक करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांसाठी नियम कठोर केले आहेत. यामुळे कंपन्यांना त्यांची हिस्सेदारी असलेल्या उत्पादनांची ई-कॉमर्सच्या माध्यमातून विक्री करता येत नाही. ई-कॉमर्सच्या नियमनातील काही वादाबाबत बेझोस हे सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करतील, अशी शक्यता आहे. लघू आणि मध्यम उद्योगांसाठी नवी दिल्लीत 'संभव' (एसएमबीएचएव्ही) या कार्यक्रमाचे १५ ते १६ जानेवारीदरम्यान आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात लघू, मध्यम आणि मोठ्या उद्योगांसाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यावर चर्चा करण्यात येणार आहे. कार्यक्रमात उद्योग तज्ज्ञ, धोरणकर्ते व अॅमेझॉनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, जेफ बेझोस यांच्या भारतभेटीबाबत अॅमेझॉनने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
हेही वाचा-टाटा-सायरस प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाची एनसीएलएटीच्या निकालाला स्थगिती